CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या दिशेनं रवाना, बस दुर्घटनास्थळी भेट देणार
😊 Please Share This News 😊
|
CM Eknath Shinde : नाशिकमध्ये (Nashik) खासगी प्रवासी बसचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रकला धडक बसल्यानं बसला भीषण आग लागून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 38 जण यामध्ये जखमी झाले आहे. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत देखील जाहीर केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकच्या दिशेनं रवाना झाले आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत ते नाशिकमध्ये पोहोचणार आहेत. नाशिकला जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. शिंदे आज बस दुर्घटनास्थळी भेट देणार आहेत.
आवश्यकता वाटल्यास जखमींना मोठ्या रुग्णालयात दाखल करणार
दरम्यान, जखमींवर उपचार करण्याला आमचे प्राधान्य असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ही मोठी दुर्घटना आहे. मृतांच्या नातेवाईकांना शासनाने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जे लोक जखमी आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च शासन करणार असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. शासन त्यांच्या पाठिशी उभा असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. आवश्यकता वाटली तर जखमींना मोठ्या रुग्णालयात देखील दाखल करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तत्काळ मदत पोहोचवण्याच्या मी सूचना त्या ठिकाणी दिल्या आहे. सकाळपासूनच मी नाशिकचे जिल्ह्याधिकारी, डॉक्टर, तेथील आयुक्त यांच्या संपर्कात होतो असेही शिंदे म्हणाले. दरम्यान, जिल्हा प्रशासन यावर नजर ठेवून असल्याचे शिंदे म्हणाले.
घटना काय
नाशिकमध्ये खासगी बसला (Bus Fire) भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज पहाटेच्या सुमारास नाशिक शहरातील औरंगाबाद रोडजवळील मिरची हॉटेल परिसरात बसचा भीषण अपघात झाला. ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्स या दोन वाहनांत अपघात होऊन ट्रॅव्हल बसला भीषण आग लागली. पहाटेची वेळ असल्याने अनेकांना मृत्यूने गाठलं. काही वेळेतच ही बस जळून खाक झाली. या अपघातात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 38 प्रवासी जखमी झाले आहेत. नाशिक जवळ नांदूर नाका येथे बसला आग लागून हा मोठा अपघात झाला आहे. ही बस यवतमाळकडून मुंबईकडे जात होती. या बसची एका ट्रकला धडक लागल्यामुळं आग लागली. बसने पेट घेतल्यानं त्यामधील काही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ही बस चिंतामणी ट्रॅव्हलची होती. नाशिकमधून ही बस मुंबईकडे मार्गस्थ झाली असताना पहाटे साडे चार ते पाच वाजेच्या सुमारास ही घडली. मृतांमधील प्रवाशी स्लीपर कोचमध्ये गाढ झोपेत असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही, परिणामी त्यांना जीव गमवावा लागल्याचे स्थानिकांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या:
- CM Eknath Shinde : नाशिक बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, घटनेची चौकशी होणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Nashik Bus Accident : नाशिकमध्ये ‘बर्निंग बस’; पहाटे प्रवासी गाढ झोपेत असतानाच काळाचा घाला, काय घडलं?
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |