Ranichi Baug : राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पिल्लांचं बारसं; आता ‘या’ नावांनी ओळखले जाणार पेंग्विन
😊 Please Share This News 😊
|
मुंबई : मुंबईत राणीच्या बागेत (Ranichi Baug)आता तीन नव्या पेंग्विनचा (Penguin) जन्म झाला आहे. या नव्या पेंग्विन पिलांची नावं फ्लॅश, बिंगो आणि अॅलेक्सा अशी ठेवण्यात आली आहेत. या नव्या पिल्लांच्या आगमनासह राणीच्या बागेतील हम्बोल्ट पेंग्विनची संख्या 12 वर पोहोचले आहे. राणीच्या बागेला यंदा 160 वर्ष पूर्ण होतायत आणि त्याच वर्षी तीन नव्या पेंग्विन पिल्लांचं आगमन झाल्यानं बागेच्या अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
प्राणी संग्रहालयात अलीकडे हम्बोल्ट पेंग्वीनच्या तीन नव्या पिलांचा जन्म झाला आहे. त्यांचे नामकरण देखील जाहीर करण्यात आले आहे. या तीन पिलांपैकी दोन नर एक मादी आहे. फ्लॅश FLASH (नर 2 एप्रिल 2022), बिंगो BINGO (नर 26 एप्रिल 2022 ) आणि अॅलेक्सा ALEXA (मादी, 9 ऑगस्ट 2022) अशी ही नावे आहेत.
19 नोव्हेंबर 1862 रोजी भायखळा येथे उद्यान सुरू करण्यात आले होते. हे उद्यान महानगरपालिकेकडे सुपूर्द झाल्यानंतर एक सार्वजनिक उद्यान म्हणून त्याच्या संपूर्ण देखभालीची जबाबदारी महानगरपालिकेने स्वीकारली. तेव्हापासून आजवर सातत्याने हे उद्यान व प्राणी संग्रहालय जनसामान्यांच्या विशेष पसंतीचे ठिकाण ठरले आहे. प्राणी संग्रहालयाचे नूतनीकरण करून या ठिकाणी विविध पक्षी, प्राणी आणण्यात आले आहेत. त्यासोबतच पेंग्विन प्रदर्शनी देखील निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्राणिसंग्रहालय फक्त मुंबईतीलच नव्हे तर देशभरातून येणाऱ्या पर्यटकांचे विशेषतः लहान मुलांचे हक्काचे आकर्षण ठरले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी उडणारी झुंबड लक्षात घेता तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ न दवडता थेट प्राणिसंग्रहालयात जाऊन पर्यटकांना आनंद घेता यावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने ऑनलाईन तिकिट नोंदणी प्रणाली सुरु केली आहे. प्राणी संग्रहालयामध्ये प्रवेशासाठी तिकिट रांग न लावता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने तिकिट घेता यावे याकरता ऑनलाईन तिकिट प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. त्यादृष्टीने पर्यटकांना अवगत करण्यासाठी परिसरात सर्वत्र क्यू आर कोड प्रदर्शित करण्यात येत आहेत. https://themumbaizoo-ticket.mcgm.gov.in/ या लिंकचा उपयोग करुन महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पर्यटकांना ही तिकिट नोंदणी करता येणार आहे.
संबंधित बातम्या :
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |