Navi Mumbai Vegetable Price : एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला आवक वाढली, दर 50 टक्क्यांनी उतरले
😊 Please Share This News 😊
|
Navi Mumbai Vegetable Price : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Navi Mumbai APMC Market) भाज्यांची (Vegetable) आवक वाढली आहे. यात पर राज्यातून येणाऱ्या भाज्यांचे प्रमाण देखील वाढलं आहे. महाराष्ट्राप्रमाणे गुजरात, मध्य प्रदेशमधून वाटाण्याची आवक होते आहे. आवक वाढल्यामुळे भाज्यांचे दर 50 टक्क्यांनी कमी झाले आहेत. एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांच्या 600 ते 650 गाड्यांची आवक होत आहे.
गेल्या दीड महिन्यापासून पावसाने उसंत दिल्याने भाजीपाल्याचे, नवीन पिकाचे उत्पादन वाढले आहे. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, अहमदनगर, सांगली, सातारा भागातून भाज्या येऊ लागल्या आहेत. घाऊक मार्केटमध्ये कोबी आणि फ्लॉवरचे दर 5 ते 8 रुपये किलो तर टोमॅटो 10 ते 14 रुपये किलोवर आले आहेत. थंडीत वातावरण चांगलं असल्याने भाज्यांचे भाव आता स्थिर राहणार असून पालेभाज्या देखील स्वस्त झाल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून गगनाला भिडणारे भाज्याचे दर आवाक्यात आल्यामुळे सर्वसामान्यांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला आहे.
एपीएमसीमधील भाज्यांचे दर प्रति किलो
वाटाणा – 50 ते 60
टोमॅटो – 10 ते 14
फ्लॉवर – 5 ते 8
कारली- 14 ते 16
कोबी – 5 ते 8
दुधी – 10 ते 12
वांगी – 10 ते 12
काकडी – 12 ते 14
भेंडी – 25 ते 32
फरसबी – 30 ते 40
गाजर – 30 ते 35
सिमला – 20 ते 30
पालेभाजी प्रति जुडी दर
मेथी – 10 ते 12
शेपू – 10 ते 12
कोथिंबीर – 8 ते 10
पालक – 5 ते 7
कांद्याची पात – 10
पावसाळ्यात भाज्यांच्या दरात वाढ
परतीच्या पावसाने राज्यात थैमान घातलं होतं, याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. परिणामी शेतकरी संकटात सापडला. भाजीपाल्याची आवक घटल्याने भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. पावसामुळे काढणीला आलेल्या भाज्या पूर्णपणे खराब झाल्या. शेतीचं मोठं नुकसान झाल्यामुळे भाज्यांचे दर कडाडले होते. मुंबईतल्या भाजी मार्केटमध्ये राज्यभरात कोसळलेल्या पावसामुळे आवक 50 टक्क्यांनी घटली होती. शिवाय नाशिक, पुणे, गुजरातहून भाज्या घेऊन येणाऱ्या गाड्या कमी झाल्या होत्या. पावसामुळे अनेक भाज्या खराब झाल्या होत्या परिणामी भाज्यांचे दर 40 टक्क्यांनी वाढले होते. परंतु आता दरांमध्ये 50 टक्क्यांची घसरण झाल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |