“राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असतील तर मी…”, मनसेच्या ‘त्या’ बॅनरबाजीवर जितेंद्र आव्हाडांची टोलेबाजी!
मनसेच्या बॅनरबाजीवर जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिक टोलेबाजी केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज गुढी पाडव्यानिमित्त शिवतीर्थावर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार आणि कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. सभास्थळी जोरदार तयारी केली जात आहे. शिवाजी पार्कवर राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री उल्लेख करणारे बॅनर लावले आहेत. या बॅनरवरून आता चर्चांना उधाण आलं आहे.
राज ठाकरेंच्या सभास्थळी “जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे” अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. यावरून आता राजकीय नेत्यांकडून टोलेबाजी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही टोला लगावला आहे. राज ठाकरे जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री असतील तर मी जनतेच्या मनातील भावी पंतप्रधान आहे, अशी उपरोधित टीका जितेंद्र आव्हाडांनी केली.
मनसेच्या बॅनरबाजीबद्दल विचारलं असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, “त्यांना जर वाटत असेल की, ते जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. तर चांगली गोष्ट आहे. प्रत्येकानं स्वप्नरंजन जरूर करावं. मला पण वाटतं की, मी भारताच्या मनातला पंतप्रधान आहे. पण माझ्या मनाला काय वाटतंय, याला काहीही अर्थ नाही.”
दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही मनसेच्या बॅनरबाजीवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर कुणाला आवडणार नाही. आमच्या साहेबांचं सरकार कधी येतंय, याची आम्ही वाट पाहतोय. राज ठाकरेंना जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी माझ्यासारखे शिलेदार आणि कार्यकर्ते आहेत. ते निश्चितपणे राज ठाकरेंच्या पाठिशी उभे राहतील.”