Mumbai Crime : रात्रीच्या वेळी रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला बेड्या, दोन तासातच आरोपी अटकेत
😊 Please Share This News 😊
|
Mumbai Crime : रात्रीच्या वेळी रिक्षाने (Rickshaw) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबईच्या (Mumbai) मालाड पूर्वेकडील कुरार पोलिसांना यश आले आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी रिक्षाचालक असून त्याचे चार साथीदार हे सर्व मालाड कुरारगाव परिसरात राहणारे आहेत. या सर्व आरोपींना कुरार पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केली आहे. 24 ते 26 वर्षे वयोगटातील हे आरोपी आहेत.
अटक करण्यात आलेले पाचही आरोपी हे मित्र आहेत. आकाश दत्ता शिंदे (वय 24 वर्षे), महेश अशोक कांबळे (वय 27 वर्षे), सनी शहाजी घोडे (वय 26 वर्षे), राम अशोक राक्षे (वय 25 वर्षे), गणेश अनिल राक्षे (वय 26 वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मारहाण करुन पैसे लुटले आणि रिक्षातून फेकून दिलं
मालाड परिसरात 18 सप्टेंबरच्या रात्री 23 वर्षीय दीनबंधू दास आणि 25 वर्षीय कल्याण दुलाई हे दोघे हॉटेलमध्ये जेवले आणि बाहेर येऊन रिक्षाची वाट पहात उभे होते. इतक्यात त्या ठिकाणी एक रिक्षाचालक त्यांना कुठे जायचं असे विचारण्यासाठी आला आणि चला मी तुम्हाला सोडतो असे म्हणत त्यांना रिक्षात बसवले. या रिक्षात अगोदरच चार जण बसले होते. मात्र फिर्यादी आणि रिक्षाचालक हे एकमेकांना ओळखत असल्यामुळे फिर्यादी त्या रिक्षात बसले. काही वेळानंतर रिक्षा काही अंतर पार करुन पुढे गेल्यावर त्या चारही प्रवाशांनी दीनबंधू दास आणि कल्याण दुलाई यांच्या मानेवर सुरा ठेवून दोघांना मारहाण केली. इतकंच नाही तर त्यांच्याकडील पाच हजार रुपये देखील लुटले. यानंतर चौघांनी त्या दोघांना रिक्षाच्या बाहेर फेकून दिले.
CCTV फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे दोन तासात आरोपींना अटक
यानंतर दीनबंधू दास आणि कल्याण दुलाई यांनी लूटमारीची आणि मारहाणीच्या घटने संबंधीची तक्रार कुरार पोलिसांना दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून कुरार पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल फोनच्या लोकेशनच्या आधारे पाचही आरोपींना दोन तासात अटक करुन ताब्यात घेतले. सध्या पाचही आरोपी कुरार पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
आरोपी स्थानिक रहिवासी आहेत. दोन आरोपीविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. सर्व आरोपी एकमेकांचे मित्र आहेत, अशी माहिती झोन 12 चे पोलीस उपायुक्त सोमनाथ घारगे यांनी दिली. रिक्षावर काही स्टिकर होते. याचे फोटो वेगवेगळ्या रिक्षास्टॅण्डवर पाठवले. त्यानंतर एका स्टॅण्डवर संबंधित स्टिकर असलेली रिक्षा आढळली. त्यानंतर रिक्षाचालका अटक करुन इतर आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या, असंही त्यांनी सांगितलं.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें |